पुणे (प्रतिनिधी) : संविधान समता दिंडी उत्साहात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. जागोजाग स्वागत झाले. प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी कार्यकर्ते संविधानाचे महत्त्व सांगत होते. संविधान आणि संतांचे अभंग याची सांगड घालून सर्व मूल्य समजावून सांगत होते.
संविधान दिंडीचा पहिला विसावा हाडपसर येथील मिलिंद बुद्ध विहारात झाला. तेथे डाॅ. शहाणे आणि साधनाताई यांनी स्वागत केले. इथे काॅ. अजय बुरांडे, साधनाताई यांनी मनोगत व्यक्त केले. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी संविधान मूल्य आणि संत विचार यांची माहिती.
त्यानंतर हाडपसर गाडी तळ जवळ जेवणाचा टप्पा झाला. तेथे अभंग, मनोगत आणि ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे प्रवचन झाले. त्यानंतर रात्री लोणी काळभोर येथे पहिला मुक्काम झाला. तेथेही शामसुंदर महाराज सोन्नर यांचे प्रवचन झाले.
या दिंडीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग आणि कीर्तनातून समता, बंधुता, स्वातंत्र्य, गणराज्य आणि लोकशाही या संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यात येत आहे. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” असा सार्वत्रिक संदेश वारकरी संप्रदाय आणि भारतीय संविधान दोघंही देत असल्याचं या दिंडीच्या माध्यमातून अधोरेखित केलं जात आहे.
या वारीचे नेतृत्व श्यामसुंदर महाराज सोन्नर करत असून, त्यांच्या प्रेरणेतून ही दिंडी केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक समतेचा संदेश घेऊन पुढे चालली आहे. दिंडीच्या नियोजनामध्ये ह.भ.प. हरिदास तमेवार महाराज,दीपक देवरे, महादेव कोटे, अशोक वारुटे, जितेंद्र राठोड यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्याच समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहे.
या संविधान समता दिंडीमुळे वारकरी संप्रदाय आणि भारतीय संविधान यांचा सुसंवाद जनमानसात पोहोचवण्याचा एक वेगळा उपक्रम राबवला गेला असून, एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रत्येकाला मिळावा हा तिचा मूळ हेतू आहे.




