.
जिद्द, परिश्रम आणि शिक्षणाच्या बळावर आयुष्य बदलता येते याचा प्रेरणादायी आदर्श ठरवत बांधकाम कामगाराची मुलगी कु. आकांक्षा नीलिमा प्रदीप गावंडे हीने महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा विभागातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) येथे कनिष्ठ भूवैज्ञानिक (राजपत्रित), गट-ब या प्रतिष्ठित पदावर उत्तम यश मिळवले आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या आकांक्षाच्या यशामागे तिच्या आईचे प्रचंड कष्ट व त्याग लपलेला आहे. आईने मसाला कारखान्यात कामगार म्हणून, तर कधी घरकाम करत कठोर परिश्रम करत शिक्षणाची गाठ सुटू दिली नाही. त्या प्रत्येक त्यागाचे सोने करत आकांक्षाने शिक्षणात उज्वल कामगिरी केली.
परीक्षेच्या तयारीदरम्यान आकांक्षावर आणखी एक मोठा आघात झाला, वडिलांचे अपघातामुळे निधन. मात्र खचून न जाता तिने पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. या कठीण काळात तिने मातोश्री कृष्णाबाई देशमुख शाळेत शिक्षिका म्हणून काम करत घराला हातभार लावला आणि अभ्यासही सुरू ठेवला.
आकांक्षा ही Geology मध्ये MS Gold Medalist असून शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना घरी शिकवण्यापासून ते पुढे Gov. Engineering College तसेच भारतीय महाविद्यालय येथे Expert Faculty म्हणून अध्यापनपर्यंत तिने स्वतःची वाट स्वतः घडवली.
तिची कर्तबगारी इथेच थांबली नाही. आकांक्षा GATE आणि SET परीक्षा उत्तीर्ण असून तिची निवड भारतातील नामांकित संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या IISER बऱ्हमपूर, ओडिशा येथे PhD साठी झाली आहे — हे तिच्या संशोधन क्षमतेचे द्योतक आहे.
MPSC मार्फत झालेल्या परीक्षेत तिने केवळ यशच मिळवले नाही, तर १४१ गुणांसह OBC महिला प्रवर्गात महाराष्ट्रात पाचवा क्रमांक पटकावत आपली क्षमता दमदारपणे सिद्ध केली.
कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि आईच्या प्रेरणेच्या जोरावर आकांक्षाने गाठलेले हे शिखर आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.










