.
अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र असलेले भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख हे एक बहुआयामी महान व्यक्तिमत्व होते.शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,कृषी क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी फार मोलाचे कार्य केलेले आहे.त्यांच्या कार्याची दखल ज्या प्रमाणात सरकारने आणि या देशाने सुद्धा घ्यायला पाहिजे होती ती घेतल्या गेली नाही. त्यामुळे एक अफाट विद्वत्ता असलेला आणि सर्व गुण संपन्न असलेला महापुरुष दुर्लक्षित राहिला आहे.एकाच वेळी अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे त्यांच्या प्रचंड कर्तुत्वाच्या मानाने समाजापासून अंधारात राहिलेले महापुरुष आहे.एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले डॉ.पंजाबराव देशमुख परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात. डी.फिल.ची पदवी प्राप्त करतात आणि भारतात परत आल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळत असताना ती नोकरी न करता, माझ्याप्रमाणेच गोरगरिबांची मुले शिकली पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करतात.ज्या काळात विदर्भात कुठेही शाळा,कॉलेज नव्हते;अशावेळी बहुजन समाजातील मुलामुलींच्या शैक्षणिक उद्धारासाठी शाळा, महाविद्यालयांचे जाळे निर्माण करणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे महान क्रांतीपुरुष होते.
ज्या काळात जातीप्रथा घट्ट होती आणि आंतरजातीय विवाह करणे निषेधार्य समजले जायचे, अशावेळी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आंतरजातीय विवाह करून जातीभेद निर्मूलनाची सुरुवात स्वतःपासून केली.आपल्या लग्नाचा स्वयंपाक जाणून-बुजून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाच्या तरुणांकडून करून घेतला.एवढे प्रखर परिवर्तनवादी विचार भाऊसाहेबांचे होते.भारताची राज्यघटना तयार होत असताना घटना समितीचे सभासद म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी भाऊसाहेबांनी पार पाडली.एकट्या भाऊसाहेबांनी घटना समितीत 500 पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवल्या. वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून भारतीय राज्यघटना सुदृढ आणि परिपूर्ण होण्यासाठी मोलाचे योगदान दिले आणि म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा घटना समितीतील आपल्या शेवटच्या भाषणात भाऊसाहेबांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा अत्यंत सन्मानाने उल्लेख केला. देशाचे कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी प्रदर्शन भरून जगातील नेत्यांना आमंत्रित केले व भारताची शान संपूर्ण जगामध्ये वाढविली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांची कर्नाटकातील होदेगिरी येथील समाधी भाऊसाहेबांनी शोधून काढली.संत तुकाराम महाराजांची पहिली आरती भाऊसाहेबांनी लिहिली.भारत कृषक समाजाची स्थापना करून देशभरातील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आखल्या.पंजाबचा शेतकरी आजही अत्यंत आदराने *पंजाब का पंजाब* म्हणून भाऊसाहेबांचा उल्लेख करतात. भाऊसाहेब हे पुरोगामी विचारांचे महापुरुष होते. अनिष्ट चालीरीती,रूढी,परंपरा, बुवाबाजी,कर्मकांड,अंधश्रद्धा, जातीप्रथा या गोष्टींवर त्यांनी प्रचंड प्रहार केले.परंतु दुर्दैवाची बाब अशी की,आज त्यांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमधील बहुतांश कर्मचारी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांच्या विरोधी वर्तन करतात. भाऊसाहेबांच्या त्यागामुळे आपला उदरनिर्वाह करू शकणारे लोक जर भाऊसाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांकडे दुर्लक्ष करत असतील तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नावाने असलेल्या अकोला कृषी विद्यापीठातील किती अधिकारी, कर्मचारी,प्राध्यापक,संशोधक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात हा संशोधनाचा विषय आहे.भाऊसाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केला परंतु भाऊसाहेबांनी निर्माण केलेल्या अनेक संस्थांमधील लोक मात्र भाऊसाहेबांच्या विज्ञानवादी विचारांपासून पूर्णतः दूर आहे.या लोकांच्या कृतघ्नपनामुळेच डॉ. पंजाबराव देशमुख यांसारखा असामान्य बुद्धिमत्तेचा महापुरुष दुर्लक्षित राहिला आहे.बहुजन समाजात असे महापुरुष फार कमी जन्माला येत असतात. त्यांच्या महान कर्तृत्वाची दखल घेणे व त्यांचे कार्य जगापर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे.आज भाऊसाहेबांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांवर थोडेफार का होईना चालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी












