.
अमरावती/प्रतिनिधी : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित कस्तुरबा कन्या शाळेचे १४ वर्षाआतील व १७ वर्षाआतील दोन्ही संघ दिनांक १७ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, लातूर या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय शालेय सेपाक टकरा स्पर्धेत सहभागी झाले होते.
अंजली राठोड, अक्षरा तायवाडे, नैन्सी जयस्वाल, वैष्णवी जीवतोडे, तृप्ती बोज्जे या खेळाडूंचा सहभाग असलेल्या १४ वर्षाआतील संघाने छत्रपती संभाजी नगर, नाशिक या संघांना पराभूत करत अंतिम सामन्यात मागील वर्षीच्या विजेत्या पुणे विभागातील सोलापूर संघाला सलग दोन सेट मध्ये पराभूत करत विजय प्राप्त केला.दोन्ही संघांनी स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या १४ वर्षाआतील संघात अंजली राठोड व अक्षरा तायवाडे तर १७ वर्षाआतील संघात आयुषी दिवाण या खेळाडूंची निवड करण्यात आली.या विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
शाळेच्या विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र राज्य सेपाक टकरा संघटनेचे उपाध्यक्ष, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. हनुमंतराव लुंगे यांना देतात. त्यांच्या व क्रीडा शिक्षक हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चनाताई लुंगे, पर्यवेक्षिका साधनाताई चंदेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.











