🔸अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी कीर्तन महोत्सवाची सांगता
सिरसाळा (प्रतिनिधीं) : स्रियांना योग्य संधी व स्वातंत्र्य मिळालं की त्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. म्हणून मुलींच्या लग्नाची घाई न करता त्यांना ज्या क्षेत्रात शिक्षण, करियर करायचे असेल ते करू द्या. त्या नक्कीच यश मिळवतील असा विश्वास हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केला. वैष्णवी हागवणे सारख्या घटना टाळायच्या असतील तर मुलगी हे परक्याचं धन आहे ही भावना डोक्यातून काढून टाका. तिच्यासाठी माहेरचा दरवाजा कायम उघडा ठेवा, असे आवाहनही त्यांनी सिरसाळा येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त सिरसाळा येथे शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डाॅ. हरिश्चंद्र वंगे, प्रभाकर वाघमोडे, माऊली गडदे, एड. अजय बुरांडे, भीमराव सातपुते, बाबुराव रुपनर, सुभाष सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते बंडू खांडेकर यांनी बहारदार सूत्र संचालन केले. तर सतीश काळे यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना शामसुंदर महाराज सोन्नर पुढे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जात-धर्मातील लोकांसाठी काम केले. एक आदर्श राज्य कसे चालवावे याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. परंतू त्यांच्या जयंतीला डिजे लावून, दारू पिऊन धांगडधिंगा केला जातो, हे दुर्दैव आहे. डीजे मुक्त जयंतीचा संकल्प करा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना डाॅ. वंगे म्हणाले की, एखाद्या महामानवाची जयंती त्याच समाजाचे लोक साजरी करतात. परंतू इथे सर्व जात-धर्मातील लोकांना सोबत घेऊन हा सोहळा आयोजित केला आहे, हे महत्वाचे आहे. जयंतीच्या निमित्ताने डीजे आणि व्यसनाच्या विळख्यात अडकणा-या तरुणाईला कीर्तन महोत्सवाचा दिलेला पर्याय हा खूप महत्वाचा आहे, असे माऊली गडदे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
किर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी बंडू खांडेकर, मुन्ना काळे, सतीश काळे, अशोक गलांडे, शिवाजी काळे, बाबासाहेब काळे, व्यंकटेश काळे, नितेश काळे, गोरख काळे, विठ्ठल वानरे, अशोक देवकते, शेंडगे सर, मदन वाघमारे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
.चौकट 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🔹वारकरी रिंगण आणि मोटारसायकल रॅली
अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाच्या समारोपानिमित्त सिरसाळा येथे मोटार सायकल रॅली आणि दिंडीचे आयोजन केले होते. दिंडी दरम्यान केलेल्या गोल रिंगणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रिंगणात तरुण कार्यकर्त्यांनी ताल धरला होता. हा आनंद डीजे पेशा किती तरी जास्त असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
