मित्रवर नंदकुमार या जीवाभावाच्या मित्राने एक्झीट घेतल्याची बातमी ऐकली ! त्याने सर्वांगाच्या संवेदनाच बधीर झाल्या . काय बोलावं . काय लिहावं . कसं व्यक्त व्हावं ? काहीच सूचत नाही ! गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे सोबत जगलो . चळवळीच्या प्रत्येक वळणावर विचारांची संगती विचारानेच लावणारा , हा बिनधास्त गडी ! म्हणूनच अजातशत्रू ! मित्रत्वाची पेरणी करत -करतच गेला . परिवर्तनाच्या सरत्यावर धरलेली मूठ त्याने कधी सोडली नाही . म्हणूनच मीच नव्हे तर , खरवाडी पासून उभ्या महाराष्ट्रात जोडलेला
मित्र गोतावळा हळहळत आहे . कां तर ?
मित्र असावा वणव्यामध्ये गारव्या सारखा.
या ओळी कदाचित कविवर्य अनंत राऊत यांनी नंदू बंड सारख्या दोस्तांसाठीच लिहल्या असाव्या !
अंशीचं दशक शेतकरी संघटनेच्या झंजावाताने व्यापून गेलं होतं . बेलोऱ्याचे विजय कडू / जवळ्याच्या सुरेखाताई ठाकरे आणि खरवाडीचे नंदू बंड या त्रयींनी अख्या तालुक्याल्या शेत शिवारातल्या शोषणा मागचं भांडवली अर्थ शास्त्र शिकवलं .या काळात कॉम्रेड सुदाम देशमुख यांच्या सोबतीनं कापूस उत्पादक संघाच्या माध्यमातून आम्हीही संघर्षात होतो . इथूनच दोस्तीचं सूत जुळलं . विचारांचे मतभेद बाजूला सारून ती दोस्ती कायम टिकली .
प्रा . श्याम मानवांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरु केली . त्यातला पहिल्या फळीचे नंदुभाऊ व आम्ही . अगदी आतापर्यंत ! गाव खेड्यात ही चळवळ घेऊन पोहचलेला नंदूभाऊ अनेक बुवा बाबांचे पोस्टमार्टम करणारा डॉक्टर होता ! गणेश हलकारे सारखी मुलूख मैदानी तोफ महाराष्ट्रला ज्या अनुभवातून मीळाली , त्याचे होम ग्राऊंडही नंदूभाऊचे !
शेतकरी संघटना राजकारणात उतरली . अचलपूर मतदार संघातून हा माणूस लिलया आमदार झाला असता ! संघटनेच्या निर्णयाला आपली आर्थिक कुवत सांगून नम्रपणे नकार देत, डॉ सुरेश ठाकरे यांच्या पाठी उभा राहिला . तसंही आपल्या सारख्या विचारी माणसांचं पार्टीसिपेट होणारं हे राजकारण नाही . हे बाजार समितीच्या निवडणूकीतल्या पराभावा नंतर कायम ठरवून घेतलेला हा माणूस ! तरिही अनेकांच्या डोक्यावर राजमुकूट चढवणारा हा बिनीचा कार्यकर्ता !
माधानचा कस्तुरबा आश्रम / पू . ताराबेन / मित्र बाळसाहेब पटवर्धन यांच्यासोबत कायम ऋणात आहो ! ही जाणीव नेहमी मनात ठेवत आश्रमसाठी सदैव सेवेकरी . शेतकरी संघटनेच्या सर्व अस्वस्थ विचारी नेत्यांची मोट बांधून शंकर अण्णा धोंडगे च्या नेतृत्वात किसान भारती संघटना उभी करतांना, माधान सारख्या खेडेगावात शरद पवारांना विचार मंथनासाठी बोलावून चोवीस तास खिळवून ठेवणारा आमचा नंदुभाऊ ! सारं अप्रूपच होतं .
पवार साहेबांच्या जवळकीने शरद क्रिडा व सांस्कृतीक चळवळीच्या विदर्भ प्रमुख पदाची सूत्रे घेऊन ,संतांच्या शोषण मुक्त विचाराच्या साहित्य धारेत
तुम्हा आम्हाला अवगाहन करून देणारा नावाडी !
लक्ष्मीकांत खाबिया सारखा सांस्कृतिक मीत्र अखेरपर्यंत हृदय कुप्पीत भरून ठेवणारा नंदूभाऊ !
आयुष्याच्या उत्तरायणात LMK फार्मर प्रोड्युसर कंपनीचा प्रवर्तक . माझ्या माधान रस्त्यावरच संत्रा पॅकिंग सेंटर उभं केलं . त्यामुळं अधिक जवळ आला . नुकतंच झालेल्य लोकसभा / विधानसभा निवडणूकीत तत्वाच्या आधारावर भागीदारी स्विकारली . हे सर्व करत असतांना कॅन्सर सारखा छुपा शत्रू आपल्या शरीरात ठाण मांडून होता . याची साधी कल्पनाही नव्हती .अखेर या महाशत्रूने केवळ तीन महिन्यात या युयत्सू योध्याला हरवलेच !
माझ्या सारख्या हजारो मित्रांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असा मित्र आज गमावला . त्याचे अखेरचे जाणे सोसवत नाही . भावपूर्ण श्रद्धांजली !
@ पंकज आवारे / माधान
