पुणे (प्रतिनिधी) : समाजात विषमता आहे म्हणून समतेचे महत्त्व सांगावे लागत आहे. जोपर्यंत समाजात पूर्णपणे समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संविधान समता दिंडीची सातत्याने सुरू ठेवावी लागेल, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांनी व्यक्त केले. संतांनी समाजात समतेचा विचार पेरला, त्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम करण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
.
संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा समता भूमी फुलेवाडा येथे पार पडला. भरपावसात वारकरी आणि संविधान प्रेमी नागरिकांची भरघोस उपस्थित होती. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथून संविधान प्रेमी मान्यवर उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह.भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार, परिवर्तनवादी कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या गीताली वि. म., गांधीवादी कार्यकर्ते अन्वर राजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाभाऊ चोपदार पुढे म्हणाले की, हल्ली वेगवेगळ्या पातळीवर वैचारिक संघर्ष दिसतो आहे. एखाद्याचे मत पटले नाही तरी त्याचे विचार स्वीकारण्याची आपली तयारी पाहिजे. आपल्यक सर्वांचे सर्वच विषयावर एकमत होईल असे नाही. पण किमान समान कार्यक्रम ठरवून समजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
विवेकवादी कीर्तन ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी समजातील वाढत असलेली विषमता कमी करण्यासाठी संत विचारच उपयुक्त ठरू शकेल, असे मत वेगवेगळ्या अभंग, ओव्याचे दाखले देत पटवून सांगितले. संविधान समता दिंडीचे संचालक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी संविधान समता दिंडी सुरू करण्या मागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील होते. राष्ट्र सेवा दलाचे माजी राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, लेक लाडकी अभियानाचे प्रणव पवार, संयोजक विशाल विमल आदी उपस्थित होते. दीपक देवरे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता पाखिरे यांनी आभार मानले. भारत घोगरे गुरुजी, नागेश जाधव, सुमित प्रतिभा, साधना शिंदे, समाधान महाराज देशमुख, सिद्धेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

