.

प्रतिनिधि/ मजहर शेख
चांदूरबाजार येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा बैलांचा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या बाजारात होणारी प्रचंड गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे ट्राफिक हवालदार रुपेश श्रीवास, पंकज वाट आणि अखिलेश थोरात यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.
बाजाराच्या ठिकाणी आणि मुख्य चौकात होणारी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे ट्राफिक पोलीस अथक परिश्रम घेतात. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि प्रेमळ वागणुकीने ते जनतेच्या मनात स्थान निर्माण करतात. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवताना त्यांचा संयम आणि समर्पण यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळतो.
“या पोलिसांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला बाजारात येणे-जाणे सोपे जाते,” असे स्थानिक व्यापारी संजय पाटील यांनी सांगितले. चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे हे ट्राफिक हवालदार आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि जनसामान्यांप्रती असलेल्या आपुलकीने खऱ्या अर्थाने जनतेचे मन जिंकत आहेत.
