चांदूर बाजारच्या आवर्तनातली पूर्णामाय जेवढी खळखळत वाहते . त्या आवाजात इथल्या चळवळीचा आणखी एक आवाज नेहमी गुंजत असतो ! तो आवाज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा असतो . अशी अनेक लढाऊ माणसे या भूमीतून जन्माला आलीत !असाच या शेती – मातीतील लढवय्या माणूस म्हणजे नंदकुमार बंड . आभाळा एवढ्या उंचींचा माणूस ! २१ मार्च २०२५ ला वयाच्या अवघ्या साठीत त्यांनी जगाचा निरोप घेतला . त्यांच्या आकस्मिक जाण्याने खरवाडी गावासह संपूर्ण तालुका हादरून गेला . या परिसरातला एक लढावू आणि वैचारिक धार असलेला कर्मयोद्धा असा अचानक निघून जाण्याने हळहळ होणे साहजिक होते ! पण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उभ्या महाराष्ट्र देशातून आलेल्या शेतकरी व प्रागतिक चळवळीतील कार्यकर्ता आणि नेतृत्वाची उपस्थिती ही नंदूभाऊंच्या आभाळा एवढ्या उंचींचे मोजमाप होते . २ एप्रील २०२५ रोजी त्यांना आदरांजली देणारी सभा खरवाडी येथे होत आहे . शेतकरी संघटनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी , आपल्या या सहसोबत्याच्या चळवळीच्या अखेरच्या थांब्यावर एक चिंतन बैठकही ठेवली आहे .
त्यासाठीच या युयत्सू माणसाच्या जीवन प्रवासाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न . १ मे १९६० नवा महाराष्ट्र ऊभा झाला . या नवनिर्माणातच २० सप्टेंबर १९६२ ला खरवाडी येथे एका सधन शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला . शाळा / कॉलेज असे शिक्षण घेत असतानाच राज्यात, शेतकरी चळवळीचे पंचप्राण शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना आत्मभान देणारी चळवळ उभी केली . अंशीचे दशक शेतकरी संघटनेचे क्रांती दशक होते . या क्रांतीवेदिवर आदरणीय प्रकाशदादा पोहरे / सुरेखाताई ठाकरे / विजयराव कडू / श्रीकांत तराळ / जगदशी नाना बोंडे / कमल कारवा अशा एक ना अनेकांनी आपले पाऊल ठेवले . त्या पावलावरच नंदूभाऊंच पाऊल पडले . शाळ शिक्षण सारेच ब्रेकअप ! एकच चिंतन एकच लक्ष्य ! शेतकरी संघटना ! गाव शिवारात पोहचून , पुराणातल्या बळीची कथा सांगत आता वामनाचे कपट चालणार नाही ! यासाठी कार्यकर्ता ते क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड ! सतत सज्ज ठेवणारा योद्धा ! राजकीय पुढाऱ्यांसाठी गावबंदी करतांना कधी सग्यासोयऱ्यातल्या नेतांना नंदूभाऊ कधी नमला नाही . असा चळवळ जगलेला माणूस . त्या काळचा त्यांचा हा क्रांती अध्याय मोठा आहे .
जोरात असलेली शेतकरी संघटना एका वळणावर राजकीय स्थितीचे मूल्यमापन करीत चळवळीचा भाग म्हणून राजकारणात उतरली .त्यातून राजकीय शिरेपेच डोक्यावर चढवण्याचे भाग्य नंदूभाऊंना आलेही असते ! पण अगदी विनम्रपणे त्यांनी अशा संधीही नाकारल्या.
आंबेठोणच्या अंगार मळ्यावर चळवळीची कवच कुंडले लेवून आलेला हा योद्धा युद्धासाठी नेहमीच सज्ज होता संघटनेमध्ये एका टप्यावर एक वैचारिक चिंतन सुरू झाले . त्याला अनेक कंगोरे होते . त्यात अनेकांना संघटना आता विजनवास वाटत होती . काहींना आत्मकेंद्री नेतृत्वाचे डोहाळे लागले होते . या स्थितित
नंदूभाऊ स्थितप्रज्ञ होवून राहीला !
अशातच शंकर अण्णा धोंडगे व संघटनेच्या बहुतेक सहकारी मित्रांनी ” किसान भारती” नावाच्या संघटनेला जन्म दिला.त्याची चिंतन बैठक माधानच्या सुप्रसिद्ध गांधीवादी आश्रमात होती . त्याचे आयोजन आणि नियोजन पायाला भिंगरी बांधून नंदूभाऊनी केले . या नेत्यांसोबत चर्चा करायला खुद् शरद पवार यांची दिवसभर उपस्थिती होती . नंदूभाऊच्या कार्यकर्ता ते नेता या प्रवासातील उंचींचा आलेख यावेळी उपस्थितांनी अनुभवला .
पुढच्या काळात, शरद पवारांच्या अधिक जवळकीने नंदूभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मोठा प्लॉटफॉर्म मिळाला . पण मुळातच, सत्तेची फळे चाखण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता . राष्ट्रवादी पक्षाच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांनी स्वतः ला झोकून दिले . शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या सर्वपरिचीत प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. या प्रतिष्ठानचे प्रवर्तक श्री लक्ष्मीकांत खाबिया यांच्या सोबतीने त्यांनी संतांच्या अभंगवाणीचा राज्यभर जागर केला. राज्यातल्या प्रत्येक कारागृहात जाऊन संत विचारांची भजनस्पर्धा आयोजीत केली.याची दखल मान्यवरांनी आणि अनेक संस्थांनी घेतली.
शेतकरी संघटनेचे काम करीत असतांनाच , महाराष्ट्रात प्रा. शाम मानवांची अंधश्रद्धा चळवळ सुरू झाली होती. या चळवळीतील पहिल्या फळीचे नंदभाऊ हे आघाडीचे कार्यकर्ते होते . श्री गणेश हलकारे सारखी अंधश्रद्धा चळवळीची मुलूख मैदानी तोफ ज्या अनुभवातून तयार झाली . त्याचे होम ग्राऊंडही नंदूभाऊच होते !
श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि शिव परिवार यांचेशी त्यांचे कौटूंबीक नाते होते . पुत्रव्रत प्रेम करणारे काका एकनाथरा वं बंड हा त्यातला दुवा होता . या संस्थेत त्यांनी सेवा देऊन दोन वर्षापूर्वी ते निवृत्त झाले . त्यानंतर त्यांनी संत्रा बागाईतदारांसाठी थेट मार्केटचे स्वप्न पाहिले होते.त्यासाठी त्यांनी LMK ही फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापून प्रकल्प ऊभा केला . पण दुर्देवाने त्यांचे निधन झाले . नंदूभाऊ सारखा मनमिळावू आणि अजातशत्रू माणूस असा अचानक निघून गेला . हे न पेलनारे दुःख आहे . त्यांना भावपूर्ण आदरांजली !
– बाबासाहेब लंगोटे.
अध्यक्ष , निशांत क्रेडिट सोसायटी, शाखा चांदूर बाजार
कार्याध्यक्ष,भक्तीधाम चांदूर बाजार
