पौराणिक काळापासून विदर्भ भारतातील अलौकिक आणि असामान्य कर्तृत्ववान असणाऱ्या कन्यांची खाण राहिलेला आहे. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी तर श्रीकृष्णाचे ज्येष्ठ पुत्र प्रद्धम्नाची पत्नी शुभांगी ही रुक्मि राजाची कन्या, रघुवंशातील इंदूमती, अगस्तीला साथ देणाऱ्या लोपामुद्रा या सर्व विदर्भातील कन्यांच्या लौकिकाची मालिका समोर नेण्याचे काम सिंदखेडराजा येथे लखोजीराजे जाधव व म्हाळसाराणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जन्मलेल्या जिजाऊने केले. लखोजीराजे जाधव यांच्या दरबारातील रामसिंग भाट व बजरंग भाट यांनी जिजाऊ जन्मा संबंधि म्हटलं आहे….
“जगदंब कृपेने झाली, मुलगी म्हाळसाबाईला |
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांला ||
सुमारे चारशे वर्षापूर्वी सिंदखेडराजात जिजाऊंच्या रूपाने अशी शक्ती जन्माला आली की, तिने दुष्टांचे निर्दालन आणि आबाल वृद्धाचे संगोपन करण्याची प्रेरणा दिली. अन्याय -अत्याचारा विरुद्ध लढण्याची शक्ती या महाराष्ट्रात निर्माण करुन संपूर्ण भारतवर्षाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला.
जिजाऊंचा विवाह वेरूळचे मालोजीराजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र संस्कृत पंडित शहाजीराजे यांच्यासोबत सन 1610 साली दौलताबाद येथे संपन्न झाला. जिजाऊ – शहाजी राजे यांचा विवाह झाल्यानंतर शहाजीराजेंच्या दरबारातील कवी जयराम पिंडे त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात म्हणतात,
“जशी चंपकेशी खुले फुल जाई |
भली शोभली ज्यास जाया जिजाई ||
तिचे किर्तीचा | चंबू जबुदिपाला,
करी साउली माऊली मुलाला || यवनांचा सामान्य रयतेवर होत असलेला अन्याय -अत्याचार बघून, स्वाभिमान हरविलेला राष्ट्र बघून जिजाऊ व शहाजीच्या मनात सर्वसामान्य रयतेला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून स्वराज्य निर्माण करण्याचे विचार येत होते. शहाजीराजेंनी स्वतंत्र स्वराज्य स्थापनेकरिता परिस्थिती अनुकूल नसतांना सुद्धा प्रयत्न केले. त्यात यशस्वी जरी झाले नसले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत शहाजीराजेंनी केला. शहाजीराजेंच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात जिजाऊ भक्कमपणे त्यांच्या सोबत उभे होत्या. शहाजीराजेंना सुद्धा जिजाऊमधील गुणांची आणि कर्तृत्वाची जाणीव होती. जिजाऊ आणि शाहजीराजेंच्या संसारात एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकी चार मुली व दोन मुलगे होते. त्यापैकी चार मृत्यू पावली. जिजाऊंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दिराच्या नावावर संभाजी ठेवले. 1623 ला जन्माला आलेले पहिले पुत्र संभाजीराजे सुद्धा बहुभाषिक आणि वडिलांसारखे कर्तृत्ववान होते. कनकगिरीच्या लढाईत लढतांना 1655 ला मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना 4 मुले झाली. चारही दगावली. 7 वर्षाचा काळ निघून गेला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी येथे जिजाऊला मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. ज्यांनी पुढे माता – पित्याचा स्वराज्यनिर्मितीचा संकल्प पूर्ण केला.
जिजाऊ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याच्या बाबतीत अत्यंत पुरोगामी विचाराच्या होत्या. जिजाऊंनी स्वतः व शिवाजी राजेंना सुद्धा कधी अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या मोहात पडू दिले नाही. शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर सती न जावून रूढीप्रिय समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. जिजाऊ अत्यंत बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी सतत शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांची,
*”ओले मूळ भेदी, खडकाचे अंग|
*अभ्यासाशी संग, कार्यसिद्धी ||”* ही शिकवण दिली.
जिजाऊ कधीच संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, जप- तप, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश – निराश झाल्या नाहीत.आजच्या स्त्रीया मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसतात. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकामागच्या प्रेरणा जिजाऊच होत्या. राजपदाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता मिळवून देणे हा राज्यभिषेकामागचा हेतू होता. राजाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता नसेल तर तो राजा सर्वमान्य होत नाही अशी त्या काळातील धारणा होती. जिजाऊने शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक व त्यांना 32 मण सोन्याच्या सिंहासनावर रयतेच्या कल्याणाकरिता आरूढ झालेले स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. त्यांचे आतापर्यंतच्या कष्टाचे व त्यागाचे फलित झाल्याने त्यांना किती - किती धन्य वाटलं असेल.
शहाजी राजेंसोबत पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे अत्यंत समाधानाने राज्यभिषेकाच्या 12 दिवसानंतर 17 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा व रयतेचा निरोप घेतला. जिजाऊंनी निरंतर रयतेच्या कल्याणाचा आणि स्वराज्याचा विचार केला. त्यांनी जणू स्वराज्याशींच संसार थाटला होता. शिवरायांना स्वराज्याचे वेड लावून त्यांच्याकडून स्वराज्यनिर्मितीही करुन घेतली. त्यामुळेच त्यांचा राष्ट्रमाता म्हणून गौरव केल्या जातो.
स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन…
===== अनिल भुसारी =====
तुमसर, जि भंडारा
8999843978
