संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाची माऊली ! हे मायपण वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीला घेउन जाते . ती वारी ! नामदेवापासून नाथ – चोखोबा अशा सर्व संतांना, हे विटेवरचे अधिष्ठानच माया देते .या ममतेच्या शिवारात भक्तीमार्गातील सर्व माजलेले तण संतांनी हातोहात उपटून काढले आहे .संत साहित्यात तो आविष्कार वेळोवेळी दिसतो . पण या वारीपासून एक संत फार लांब उभे होते . ते गुलाबराव महाराज !
खरे तर , माऊलींचा आणि त्यांचा आध्यात्मिक नातेबंध आहे .हे बापलेकराचे नाते औरस आहे .त्यांना ज्ञानेश कन्येचा अधिकार मिळाला आहे ! तो अबाधीत
आहे . इतका हक्काचा आहे की ,त्यांच्या संकल्पनेतून
वारकरी संप्रदायाला माउलींचे फेटाधारी चित्र अधिकृत पणे स्वीकारावे लागले ! तरीही गुलाबराव महाराज वारी आणि वारकऱ्यांत दिसले नाहीत !
त्याला कारणही तेवढेच आहे .भक्तिमार्गाला त्यांनी नवे अधिष्ठान दिले .तो मधुराद्वैत संप्रदाय ! लालनभक्ती
हा इश्वरासमीप घेऊन जाणारा भक्तीमार्ग त्यांनी सोपा केला .शिष्य पंचायतनाला ही वाट अनुसरायला लावली
त्यामुळेच वारीची वाट कधी मोकळी झाली नाही ! तरी ,
आपला संप्रदाय हा वारकरी संप्रदायाची समांतर धारा आहे .हवे तर ,त्याला उपशाखा म्हणावी ! पण वारकरी पंथ हाच विश्वधर्म होईल .असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला .कारण ,अठरापगड जातीतून आलेले संत प्रवाह वारकऱ्यांच्या मेळ्यात एक झाले आहेत . त्यांना
सोवळ्याचे वावडे नाही ! असा त्यांचा अभिप्राय आहे .
श्री महाराज पंढरपूर आणि वारीला आपल्या हयातीत कधी गेले नाही .असेही नाही .आपला शिष्य – सखा रामचंद्रभाऊ मोहोड यांचेसह त्यांनी विठ्ठलदर्शन घेतले आहे . पुण्यावरून त्यांनी वाऱ्याही केल्या .पण लौकिक अर्थाने ते वारकरी झाले नाहीत ! वारकरी होणे यासाठी एक साधा नियम आहे . गळ्यात तुळशीमाळ घालून घेणे .बहुदा एखाद्या फडकऱ्याकडून किंवा वारकऱ्याकडुन ही माळ घातल्या जाते .अपवाद होता जोग महाराजांचा ! ते अभिजन वर्गातून आलेले . त्यांना वारकरी विचार पटला .पण कुणीही फडकरी त्यांना माळ घालत नव्हते . त्यांनी माळ विकत घेऊन ,माऊली च्या समाधीवर ठेऊन ती गळ्यात घालून घेत ,वारकरी झाले .वारकरी संप्रदायासाठी त्यांचे योगदान अत्युच्च आहे . पण , गुलाबराव महाराजांनी हे काहीही केलं नाही ! त्याची त्यांना गरजही वाटली नाही . डॉ .सदानंद मोरे यांनी फार मार्मिकपणे गुलाबराव महाराजांच्या वारकरी असण्याला पुष्टी दिली आहे .त्यांनी ,माऊलीची
एक ओवी प्रमाण म्हणून दिली —
पित्याचे ते धन | पुत्रा वंचिल ते कोण
खुद्द माऊलीची कन्या असलेल्या ज्ञानेशकन्येला वारसा हक्काने वारकरी धन मिळाले आहे . ते आपसूकच आहे . त्यासाठी त्यांना वारकरी होण्याच्या कोणताही
सोपस्कार करण्याची गरज नव्हती !
इतकं सर्व असतांना जवळपास पाऊणशे वर्षे श्री गुलाबराव महाराज वारकऱ्यांच्या मेळ्यात पोहचले नाहीत ! मधुराद्वैत संप्रदायाची चौकट आणि वारकरी
संप्रदायाची टाळाटाळ ! अशा पेचात या ज्ञानेशनंदिनीला कदाचित थांबावे लागले असेल ? पण ,तीन दशकांपूर्वी एका साध्या वारकऱ्याने ही वाट मोकळी केली .
ते नानाजी इंगोले .शेतकरी कुटुंबातील हा माणूस . शेती मातीतला . आमच्या परिसरात महानुभावाची काशी जवळच असल्याने या पंथाचा जास्त प्रभाव आहे त्यात वारकरी म्हणून जी माणसं व काही गावं टिकून आहेत .त्यातले बोराळ्याचे नानाजी ! या भागात श्रीसंत गुलाबराव महाराज फारसे माहीत नव्हते .पण निमित्त
ठरला माधानचा जन्मशताब्दी महोत्सव ! बाबा मोहोड या साहित्यिकांच्या कुशल नियोजनाने 1981 /82 हे वर्ष
गुलाबराव महाराजांचे लोकगंगेत अवगहान करणारे ठरले ! नानाजीचा मुक्कामही माधानातच पंडितराव मोहोड यांच्याकडे होता .त्यातून नानाजींच्या आयुष्याने समर्पणाचा वेध घेतला . संत गुलाबराव महाराज यांचा जीवन प्रवाह ज्या दिशेने वाहत होता ! तो अवरुद्ध होऊ नये ! हाच ध्यास घेऊन ते पुढे निघाले .या समर्पणातून चांदूर बाजारला भक्तिधाम नावाचे अध्यात्मिक केंद्र उभे राहिले .परिसरातील शेकडो वारकऱ्यांच्या मेळा जमला . प्रा .केशवराव ठाकरे सारखे वारकरी परंपरेतून आलेले विचारी वारकरी सोबतीला आले .1992 च्या आषाढात ,नानाजींनी ज्ञानेश नंदिनीची पालखी खांद्यावर घेतली आणि हरिनामाच्या गजरात पंढरपूर वारी सुरू झाली ! यारे यारे सकळ जन . अशा वारकऱ्यांच्या खांद्यावर खुद्द माऊलींची कन्या पांडुरंगाच्या भेटीला निघाली . पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच ! चंद्रभागेच्या वाळवंटात बापलेकीचा नाम गजर भगवी पताका घेऊन सर्व संतांच्या आवर्तनात मिसळला . भेटी लागे जीवा लागली ही आस ! अशी तुकोबांच्या अभंगप्रमाणे खुद्द पांडुरंगालाही या ज्ञानेश कन्येच्या भेटीची ओढ होती ! डोळ्याचे पारणे फिटावे आणि पुंडलीकाच्या भक्ती वाटेचा आठव व्हावा . अशी ही भेट ! नानाजींचा ध्यास कामी आला आणि नव्या संकल्पाच्या सिद्धीसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले . विठ्ठला ! तुझ्या सहवासाचा सुगंध आता यापुढे माझ्या ज्ञानेश नंदिनीच्याअंगणात सदैव राहावा . म्हणून तुझ्या पायाशी या पंढरपुरातच मुक्कामाला जागा दे !
तसेच घडले . सांगोला रोडवर श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम संस्थेचे धर्मकेंद्र उभे राहिले . ज्ञानेश कन्येचा
सगुण विग्रह प्रतिष्ठापीत झाला .पण हे पाहायला आता नानाजी नव्हते ! ते वैकुंठवासी झाले .
पण नानाजी इंगोले यांनी ज्ञानक्षेत्रात बांधून ठेवलेल्या कर्मठ गाठी सोडत ,आपल्या अनन्य भक्ती साधनेतून श्री गुलाबराव महाराजांचा वारकरी अनुबंध जोडला ! त्याचा विसर , येणाऱ्या पिढ्यांना कधीही पडणार नाही . तुकोबांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांनी गुलाबराव महाराज स्मृतिशताब्दी वर्षात चांदूर बाजार आणि घुमानच्या अभा .मराठी साहित्य समेलन अध्यक्ष पदावरून हा वारकरी अनुबंध कुणालाही तोडता येणार नाही ही ग्वाही दिली आहे .तर तरुण अभ्यासू संपादक सचिन परब हे दरवर्षी ” रिंगण ” हे वारकरी संतावरचे वार्षिक , आषाढीला विट्ठल चरणी अर्पण करतात .
त्या आमच्या मित्रानेही भक्तीधामला येऊन मुक्ताबाई मंदिरात मुक्ताबाई विशेषांक प्रकाशित करताना हीच बाब अधोरेखित केली .
त्यामुळे हा वारकरी अनुबंध कुणालाही तोडता येणार नाही . भक्तिधामचे अध्यक्ष श्री रविभाऊ इंगोले यांच्या समर्थ खांद्यावर आता ही ज्ञानेश कन्येची पालखी आहे .ती कधीही कुंभ मेळ्याच्या दिशेने जाणार नाही ! याची खात्री आहे .जय हरी विठ्ठल .
© पंकज आवारे , माधान ( चांदूर बाजार )
