श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ” माणिक ” ते “राष्ट्रसंत “हा प्रवास केवळ मानव मुक्तीचा विचार मांडणाराआहे. धर्म हा शोषणाचे हत्यार होऊ नये . तो आत्मोन्नतीचा जीवन मार्ग आहे या विचारांचे आशीर्वचन ज्या प्रज्ञावंत संताने राष्ट्रसंतांना दिले ते संत गुलाबराव महाराज !
अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या यावलीच्या चंद्रमौळी झोपडीत , सुसाट वादळ वाऱ्याच्या गजरात तुकडोजींचा जन्म झाला .या दरिद्री नारायणाच्या घरी बारसे होणार तरी ,कसे ? सांजेला पीठ नाही अन दिव्यात तेल नाही ! पण या बालकाचा जन्म , धर्म जागरणासाठी
आहे .याची जाणीव प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या दिव्यदृष्टीला झाली . हे बाळ क्रूरकर्मा कंस मामाचा जसा शिरच्छेद करेल , तसाच तथाकथित धर्माच्या आडून बंधने लादणाऱ्या इंद्रदेवापासूनही लोकांना भयमुक्त करु शकते ! या बालकृष्णाचे नाव आता मीच ठेवले पाहिजे ! या निश्चयासह ही ज्ञानेशकन्या लगबगीने यावलीच्या त्या झोपडीत शिरली . तिच्या ज्ञानचक्षूनी पाळण्यातल्या बाळावर नजर रोखली .या प्रज्ञासूर्याच्या ज्ञानप्रकाशात हे बाळ न्हाऊन निघालं ! माणिक मोत्याची मौलीकता आणि स्फटिकी निर्मळता या बालकाच्या चेहऱ्यावर तेजाळत होती . श्रींच्या तोंडून सहज शब्द निघाले , ” माणिक… !” वरखेडचे विदेही संत आडकोजी महाराजांची प्रासादिक प्रेरणा आणि तत्वज्ञ संत गुलाबराव महाराजांनी केलेले नामकरण ! या योगायोगात आता नव्या धर्मचिंतनाला सुरवात होणार होती
हे बाळ हळूहळू वाढत होतं.त्यात गुलाबराव महाराजही निजधामला निघून गेले .ज्याच्या मुखी शास्त्र वेद ! अशा या महात्म्याने आपल्या नावाचे पदवीदान केले खरे ! पण त्यांचे साधे मुखदर्शनही होउ नये ? त्याला आपण मुकलो . आता मला कोणता पंडित शिकवेल ? योग याग संन्यास सर्व काही झालं ! पण धर्माच्या नावाखाली भोवती तर , सर्व व्यापार आहे ! लोकांसाठी “तुकड्या ” असलो तरी त्या दृष्टीहीन संताच्या रत्नपारखी दिव्यदृष्टीतील मी “माणिक रत्न” आहे . या आशीर्वादाचा मी धनी आहे .इतकी श्रीमंती असल्यावर धर्मदान करण्यासाठी मला काय उणे आहे ? अशा आत्मविश्वासाने तुकडोजींचा धर्म जागर सुरु झाला .
कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखवले . जळी स्थळी पाषाणी सदा सर्वत्र ,असा हा भगवंत ! त्याची वाणी हे गीता वचन ! नाते -गोते , जाती -पाती सर्वच निरर्थक . खरे तर हेच गीतेचे प्रमाण सूत्र ! मात्र चतुर माणसांनी ते आपल्या हातात घेतले . मी श्रेष्ट तू कनिष्ठ . असा सवता सुभा उभा केला .
ही धर्मगाठ हातात ठेऊन पांडित्याचा आव आणत संस्कृत भाषा बटीक केली . त्यातून सोयीचे धर्मसार निघू लागले . साराच घोटाळा झाला ! धर्म शोषणाचे हत्यार झाले . भक्ताची लूट सुरु झाली . मग साक्षात भगवंताचा वचननामा असलेली “भगवद्गीतगीता ” संस्कृतमध्ये हिरमुसून बसली . हजारो हजारो वर्षे !
आठशे वर्षांपूर्वी ज्ञानदेवांना ” जो जे वांशील तो ते लाहो ” असा विश्वात्मके परमेश्वर दिसला ! साक्षात गोपाल कृष्णाची तिच गीता आता माऊलीच्या मुखातून अमृताचा निर्झर घेऊन निघाली . थेट लोकांच्याच भाषेत ! ही देववाणी मग मनामनात पोहचली . या हृदयीचे त्या हृदयी सारेच गुपित विठ्ठल नामात विरघळले ! यारे यारे सकळ जन ! आताही कुरुक्षेत्र होतेच ! पण होती वारी , होता
भीमा तिर . होते पंढरपूर ! विठ्ठलच विश्वरूप आणि सर्वच कस्टकरी /वारकरी होते अर्जुन !
कृष्ण – ज्ञानदेवातील हे युगांतर , शतके पार करून गेले .विसावे शतक ! पुन्हा भगवंताच्या गीतेची आठवण झाली . कृष्ण पती, ज्ञानेश्वर पिता हा नातेबंध सांगत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी समन्वयाचे नवे सूत्र दिले ! सर्व धर्म सारखे . दिशाही एकच .परमेश्वरही एकच ! याच दिशेने तुकडोजी मार्गस्थ झाले .
यावेळचे कुरुक्षेत्र मात्र गावखेडे होते ! गावातला ग्रामनाथ आता अर्जुन ! हे कुरुक्षेत्र षडरिपूनी वेढले होते .श्रद्धेची जागा अंधश्रद्धेने घेतली , धर्माची अधर्माने ! खेड्याच्या जीवावर शहरे नवीन होत होती .धनदांडग्यांच्या लुटीचे सावजही खेडेच . या ग्रामनाथाला जागे करण्यासाठी पुन्हा भगवंत गीता सांगत होते .
पण यावेळची गीता ही ” ग्रामगीता ” होती . ग्रामोन्नतीसाठी नवा धर्म नवी पूजा सुरू झाली
धर्म संस्थापणार्थय संभवावे मी युगे युगे ! भगवंताचे कार्यच हे . गोंधळलेल्या अर्जुनाला भानावर आणणारे काम ! तुकडोजीने तेच केले . म्हणूनच राष्ट्रसंत झाले .
प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आणि राष्ट्रसंत
असा हा कर्मबंध जोडला की , सारेच सुखर होते . अध्यात्म समजते . धर्म समजतो . आजची गीता ग्रामगीता ! ३० एप्रिल म्हणजे ग्रामजयंती . राष्ट्रसंतांची जयंती . त्यानिमित्ताने या गीतेचे महत्व समजून घेतले पाहिजे .
– पंकज आवारे,
प्रज्ञाचक्षु ज्ञान विज्ञान अभ्यास केंद्र माधान
